मृत्युपत्रं ७: हुकूमावरून…

नयनाला जी झोप लागली, ती परत उठलीच नाही. तिच्या इच्छेनुसार तिच्या मैत्रिणीने तिचं शेवटच मृत्युपत्र सगळ्यांसमोर वाचून दाखवलं.

  • तुम्ही हे पत्र वाचत आहात म्हणजे दोनच शक्यता आहेत: एकतर मी मेले आहे किंवा मी व्हेंटीलेटर वर आहे. मी व्हेंटीलेटरवर असल्यास माझ्या परत येण्याची वात पाहू नये. सहा तासाच्या आत व्हेंटीलेटर काढून घ्यावा.
  • मी माझे अवयव (हृदय, किडनी, डोळे, त्वचा, केस इ.) आणि देहदान करायचे ठरवले आहे. माझे अवयव कुणाला द्यावेत ह्यात माझ्या पालकांचे मत घेऊ नये, तो निर्णय सर्वस्वी डॉक्टरांचा असेल. माझा देह मेडिकल कॉलेजमध्ये देण्यात यावा जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यातून काहीतरी शिकता येईल.
  • माझ्यासाठी कुठलीही शोकसभा, स्मरणसभा, माझ्या आठवणीत माझ्या फोटोसचं एक्झीबिशन, दहावं, तेरावं, श्राद्ध, गावजेवण असे प्रकार करू नयेत. अगदीच काही करायची हौस असेल तर माझ्या मित्रांना दारू पार्टी द्यावी.
  • माझे कपडे, accessories आणि मेक-अपचं सामान ह्यातलं माझ्या मैत्रीणीना काही हवं असेल तर द्यावं. नाहीतर डोनेट करावं. घरात त्याचा पसारा मांडून ठेवायची गरज नाही. पुस्तके शहरातील नगर वाचनालयास डोनेट करावीत.
  • माझ्या flat वरील फर्निचर, भांडी, इलेक्ट्रोनिक्स हे सर्व माझ्या एकट्या flatsवर राहणाऱ्या मित्रपरिवारास त्यांच्या गरजेनुसार वाटून टाकावीत.
  • माझ्या बॅंक अकाऊंट मधले सर्व पैसे आणि insurance मधून येणाऱ्या रकमेतील अर्धे पैसे अग्निशमन दलास द्यावे.
  • माझा DSLR, त्याच्या लेन्स आणि त्याची supplementary equipments माझ्या आईला देण्यात यावीत. माझ्यातली कला तिच्याकडून आली आहे आणि त्यामुळे माझा फोटोग्राफीचा वारसा ती चालवेल.
  • हे वाचताना, वाचून झाल्यावर कुणीही रडायचं नाहीये नाहीतर मी परत येऊन त्या व्यक्तीला माझ्या खोड्यांनी हैराण करेन.

हुकूमावरून,

नयना.

समाप्त.

 

Advertisements

मृत्युपत्रं ६: १७६० भानगडी…

नयनाला सगळं ऐकू येत होतं, समजत होतं, दिसत होतं पण react होता येत नव्हतं. आई, बाबा आणि आजी रडताना दिसत होते. बाहेर तिचा सगळा ग्रुप उभा आहे हे जाणवत होतं. पण आपल्याला सगळं समजतंय हे सांगता पण येत नव्हतं. अंगाला ढीगभर नळ्या लावल्या होत्या आणि डोक्यावर बँडेज गुंडाळल होतं. नयनाचा tumor काही प्रमाणात काढण्यात डॉक्टरांना यश आलं होतं पण ती कधी उठेल काहीच सांगता येत नव्हतं. इथे नयना पण परिस्थितीपुढे हतबल होती. थोडा वेळ गेल्यानंतर नयनाचे मित्र-मैत्रिणी तिला भेटायला आले. अर्धे रडत होते आणि अर्ध्यांना काय करावं सुचत नव्हतं. नयना आता रडके चेहरे बघून खूपच कंटाळली होती. त्यांना रडू नका असं सांगता ही येई ना. ना तिला तिची कुठली पत्र लिहिता येत होती, न कुठली खोडी काढता येत होती. zero entertainment. तिला बेड वर पडल्या पडल्या Greys Anatomyचे सगळे episodes आठवत होते. Once Upon A Time मध्ये जसं राजकुमार/राजकुमारी आपल्या प्रियकर/प्रेयसीला किस करून लांब पल्ल्याच्या झोपेतून उठवतात तसंच आपलापण कुणीतरी Prince Charming येईल असं तिला वाटत राहिलं. पण कुणीच आलं नाही. ३ Editos मधल्या राजूला उठवण्यासाठी त्याच्या मित्रांनी जे प्रयोग केले तसं ही कुणी काही करत नव्हतं. कंटाळून शेवटी ती झोपून गेली.

नयनाला हळूहळू जाग आली तेव्हा तिला जाणवलं कि तिच्याभोवती काहीलोक जोरजोरात बोलत आहेत. ते कोण आहेत आणि काय बोलत आहेत हेच समजत नव्हतं. तिचं डोकं दुखू लागलं आणि गाढ झोपेत असताना कुणीतरी गार पाणी अंगावर ओतल्यावर माणूस जसा उठतो तशी ती खाडकन उठली. तिला वाटत होतं आपण शुद्धीवर येऊ तेव्हा आपल्यासमोर आई-बाबा किंवा डॉक्टर्स असतील पण समोर अनपेक्षित काहीतरी घडलं. तिच्या पुढ्यात असणाऱ्या लोकांना बघून तिला इतका जबरी shock बसला कि तिला वाटलं आपण परत hibernation मध्ये जाऊ. तिच्या समोर तिचे ८ जुने प्रियकर आशाळभूत नजरा घेऊन ओळीने उभे होते.

नयना आता मारणार म्हटल्यावर सर्व तिला भेटायला आले होते. पण खरं कारण हे होतं कि ते सर्व त्यांची पत्र घ्यायला आले होते. त्याचं झालं असं कि २५ वर्षांच्या आयुष्यात नयनाने literaly १७६० भानगडी केल्या होत्या पण त्यातल्या ८च genuine होत्या. पण ह्या ८ ही जणांना नयनाने फाल्तू कारणं देऊन सोडून दिलं होतं. जेव्हा ह्यांना समजलं कि नयना तिची मृत्युपत्र लिहित आहे तेव्हा सगळ्यांनी एकमेकांना contact केला आणि नयनाला भेटायला आले. आता सगळ्यांना आपापली पत्र हवी होती आणि पत्राच्या निमिताने ब्रेक-अपची खरी कारणं. पण नयनाला आता कुठलंही पत्र लिहिण्या इतकी ताकद उरली नव्हती. म्हणून तिने तिच्या एका मैत्रिणीला बोलावलं आणि मोठ्ठी पत्र लिहिण्या ऐवजी एक किंवा दोन ओळीत तिच्या प्रियकरांना ब्रेक-अपची कारणं सांगायचं ठरवलं.

प्रियकर १: long distance relationship; खूप बोर करायचा; शेवटी नयना त्याला कंटाळून दुसऱ्याच्या प्रेमात पडली

प्रियकर २: फारच अभ्यासू होता; त्याला सगळे चम्पू म्हणायचे म्हणून हिला चम्पूची चम्पी; खूपच पुस्तकी भाषेत बोलायचा आणि सारख्या तिच्यावर कविता करायचा; शेवटी नयना त्याला कंटाळून दुसऱ्याच्या प्रेमात पडली

प्रियकर ३: तिच्यापेक्षा वयाने लहान होता; खूपच बालिश वागायचा; शेवटी नयना त्याला कंटाळून दुसऱ्याच्या प्रेमात पडली

प्रियकर ४: तिच्यापेक्षा वयाने मोठा होता; सारखा दादागिरी करायचा; शेवटी नयना त्याला कंटाळून दुसऱ्याच्या प्रेमात पडली

प्रियकर ५: तिचा boss असल्याने कामावर विचित्र परिणाम होऊ लागला; त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात पण तो तिला प्रियकर कमी आणि boss जास्त वाटायचा; शेवटी नयना त्याला कंटाळून दुसऱ्याच्या प्रेमात पडली

प्रियकर ६: तिच्या सोबतच काम करायचा; चिपकू होता आणि बढाया मारायचा; प्रियकर क्र. ५, नयना आणि हा असा प्रेमाचा त्रिकोण होऊन नयनाच्या डोक्याला ताप झाला; शेवटी नयना त्याला कंटाळून दुसऱ्याच्या प्रेमात पडली

प्रियकर ७: तिचा sex पार्टनर; नयनाच्या आयुष्यात इतका involve झाला कि नोकरी-धंदा सोडून हिच्या पैशावर जगू लागला; शेवटी नयना त्याला कंटाळून दुसऱ्याच्या प्रेमात पडली

प्रियकर ८: एकाच जागी घर बांधून संसार थाटून राहायचं स्वप्न होतं ह्याचं; नयनाला मात्र जग फिरायचं होतं; शेवटी नयनाने कंटाळून ह्याला सोडून दिलं

सगळे प्रियकर नयनाने कंटाळा आला म्हणून सोडून दिले. तिला so called खरं प्रेम किंवा तिचा perfect match मिळालाच नाही. तिच्या प्रियकरानी तिच्या त्या चिठ्ठ्या वाचल्या आणि आपण उगाच विचारलं असं त्यांना वाटू लागलं. नयनाने मग तिच्या मैत्रिणीला तिने ऑपरेशन आधी स्वत: लिहिलेलं एक शेवटचं पत्र दिलं आणि ती गाढ झोपून गेली…

क्रमश:

 

मृत्युपत्रं ५: कौटुंबिक कलह…

फोटोग्राफी करायला नयना जेव्हा परत आली तेव्हा तिने तो जळका flat सोडायचे ठरवले. फोटोग्राफी म्हणजे जरा महाग प्रकरण, त्यात पैसे जास्त लागणार. घरच्यांपासून लपवून करायचं तर पैश्यांचं नीट planning करावं लागेल. मग ती आपल्या दुसऱ्या काही मैत्रिणींसोबत रूम share करून राहू लागली. तिच्या तिथल्या घर मालकीण भयंकर होत्या. त्या इतक्या कंजूष होत्या कि दुसऱ्या व्यक्तीने स्वत:साठी केलेला खर्च पण त्यांना बघावयाचा नाही. ॠुतू कुठलाही असू देत, त्या अंघोळीला फक्त एक बादलीच पाणी द्यायच्या, कपडे धुवायला extra बादली हवी असेल तर द्यायच्या नाहीत, कधी ऐनवेळी gas संपला आणि त्यांना दुध तापवायला दिलं कि त्यावरची साय काढून घ्यायच्या, स्वत: छान छान पदार्थ करायच्या पण कधीच पोरींना जेवायला नाही बोलावलं, ह्याउलट पोरींनी काही केलं तर चवीला बघू गं म्हणत अर्धा पदार्थ त्याच संपवायच्या, सारखं हे नका करू आणि ते नका करू अशा हजार सूचना करायच्या. मग नयनाने पण त्यांना त्रास द्यायची शक्कल लढवली. त्या दुपारी झोपलेल्या असल्या कि तेव्हाच सगळी खोली साफ करायला घ्यायची. त्या धूळ आणि आवाजामुळे बाई काही झोपू शकायच्या नाहीत. नयनाने एकदा बाईच्या पोरीला आणि तिच्या एका खास मित्राला गाडीवरून जाताना पाहिलं. त्यांच्यातला गाडीवरचा चिपकू romance लगेच आपल्या camera मध्ये capture केला. ते फोटो बाईला निनावी courier केले. मग काय जो free मध्ये daily soap बघायला मिळाला नयनाला विचारूच नका…एकता कपूरचे पण सगळे रेकॉर्ड तिने त्यादिवशी मोडीत काढले.

तेच फोटो आज परत बघताना नयनाला अजून हसू आलं. तिच्या बाबांना तिने असं laptop समोर बसून हसलेलं अजिब्बात आवडायचं नाही आणि आता तर त्यांना तिचं काहीच आवडत नव्हतं. नयनाने ते चिडू नयेत म्हणून लगेच त्यांना ती का हसतीये ते सांगितलं. हे ऐकवल्यावर तर ते अजून भडकले. एखाद्या घरात भांडणं लावण्यासाठी म्हणून फोटोग्राफी शिकली काय असं म्हणून अजून ओरडले. नयनाला आता सुचेना काय करावं तेवढ्यात तिला बोकील मॅडम आठवल्या.

नयनाच्या फोटोग्राफी क्लास मधल्या तिच्या बोकील मॅडम ह्या नयनाच्या आयुष्यातील एकमेव शिक्षक होत्या ज्यांनी तिची कौतुकं केली. त्यांनीच तिला बरीचशी कामं पण मिळवून दिली होती. बाबांना मनावण्यासाठी नयनाने बोकील मॅडमना फोन केला. बोकील मॅडम लगेच तिची मदत करण्यासाठी तयार झाल्या. नयना, त्यांची आवडती विद्यार्थिनी हॉस्पिटल मध्ये आहे म्हटल्यावर त्या धावत तिला भेटायला आल्या. पण त्या आल्यावर नयनाला आधार मिळण्य ऐवजी shock बसला. बोकील मॅडम अगदी रोड दिसत होत्या, त्यांचं तेज गेलं होतं आणि त्यांच्याकडे बघून वाटत होतं कि त्या solid डिप्रेशनमध्ये गेल्या आहेत. बोकील मॅडमने आल्याआल्या बाबांची समजूत घातली, त्यांना पटलं आणि ते नयनाशी नीट बोलायला पण लागले पण नयनाच्या मनात मॅडमनी तिच्याशी share केलेल्या तक्रारीच घुमत होत्या.

त्याचं झालं असं कि नयनाने पाठवलेले फोटो बघून बाईने खूप गोंधळ घातला. तेव्हा नयना आपला कोर्स संपवून एका assignmentच्या निमित्ताने दिल्लीला गेली होती. मधल्या काळात बाईची मुलगी घर सोडून त्या मुलासोबत पळून गेली आणि तिने त्याच्याशी लग्न केलं. तो मुलगा दुसरा तिसरा कुणी नसून बोकील मॅडमचाच एकुलता एक मुलगा होता. बाईची मुलगी प्रचंड आळशी आणि स्वार्थी. तिला लग्नानंतर वेगळ राहायचं होतं म्हणून रोज भांडणं उकरून काढायची. मॅडमचा मुलगा पण तिच्या बाजूने बोलायचा. जुन्या मराठी पिक्चरमध्ये असायचं त्याच्या उलटं सुरु होतं, इथे सून सासूचा मानसिक छळ करत होती. शेवटी एकदाचं बोकील मॅडमनी वैतागून त्यांना वेगळ रहायची परवानगी दिली. पण एवढ्या वरूनच तिचं भागलं नव्हतं. तिला बोकील मॅडमच्याच घरात राहायचं होतं. मग काय बोकील मॅडमनी मुलाच्या सुखाकरता आपला इतक्या वर्षांचा संसार गुंडाळला आणि दुसरीकडे रहायला गेल्या. ही अलका कुबल स्टाईल sacrifice story ऐकून नयनाला खूपच वाईट वाटलं.

जेव्हा तिने बाईला ते फोटो पाठवले होते तेव्हा कितीतरी काळ तिने अविश्वासात घालवला कारण त्यावेळेस तिची ती खोडी इतर खोड्यांसारखी boom-rang बनून परत अंगाशी आली नव्हती. पण तिला काय माहित कि नंतर हे एवढं मोठ्ठं रामायण होणार आहे ते.

आता आई बाबांनी तिला आणि तिच्या फोटोग्राफीला accept केलं होतं पण तिचं मन काही स्थिर राही ना. आता तिने तेच केलं जे ती इतके दिवस करत आली होती. बोकील मॅडमना पत्र लिहिलं. त्यांना सगळं सांगितलं आणि म्हणाली कि दुसऱ्याच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करायची किंमत तिला कळली आहे.  बोकील मॅडमना पत्र वाचून आधी राग आला आणि नंतर त्यांनी काहीतरी करायचं ठरवलं. त्या लगेच आपल्या जुन्या घरी शिफ्ट झाल्या आणि “हे घर आणि हा संसार हे माझं वैयक्तिक आयुष्य आहे आणि त्यावर कब्जा किंवा ढवळाढवळ करण्याचा हक्क कुणालाच नाही, अगदी माझ्या मुलगा आणि सूनेला पण नाही,” असे ऐकवून मोकळ्या झाल्या. सासू बाईंचं नवं रूप बघून सूनपण बावचळली आणि ताळ्यावर आली. इथे बोकील मॅडमने त्यांच्या घराचा ताबा घेतला आणि तिथे ऑपरेशन थिएटरने नयनाचा.

क्रमश:

मृत्युपत्रं ४: शिक्षणाचा बट्ट्याबोळ…

नयनाने ग्रॅज्युएशन पूर्ण केले तेव्हा सगळ्यात जास्त आनंद तिच्या आजीला झाला. आता तिच्या आजीने हिच लवकरात लवकर लग्न लावून टाका असं फर्मान सोडलं आणि ते तिच्या आईला ही पटलं. लग्न झालं, जबाबदारी पडली कि ही पोरगी सुतासारखी सरळ होईल असं त्यांचं मत होतं. पण तिच्या वडिलांना मात्र हे पटेना. आपली पोरगी कितीही बदमाश असली तरी तिला सरळ करण्यासाठी लग्न हा उपाय नाही असं त्यांचं मत होतं. तिने पुढे शिकावं, स्वत:च्या पायावर उभं राहावं असं त्यांना वाटायचं. नयनाला बाबा तिच्या बाजूने असल्याने आई आणि आजीशी भांडायला जरा सोप्पं जात होतं. पण तरी कुठेतरी माशी शिंकलीच! नयनाला फॅशन फोटोग्राफर बनायचं होतं तर तिच्या वडिलांची इच्छा होती कि तिने IAS किंवा IFS करून आपलं सरकारी अधिकारी बनण्याचं स्वप्न पूर्ण करावं. ह्यावर नयना त्यांच्याशी भांडली आणि ते भांडण इतकं विकोपाला गेलं कि शेवटी तिच्यासमोर दोनच पर्याय उरले: IAS किंवा IFS चा अभ्यास करायला जायचं किंवा लग्न करायचं. नयनाने घरच्यांसमोर पहिला पर्याय मान्य केला.

पण शहरात आल्यावर मात्र तिने तेच केले जे तिला करायचे होते. बाबांनी स्पर्धा परीक्षांच्या क्लाससाठी आणि त्याचसोबत सलग मास्टर्स करण्यासाठी दिलेले पैसे तिने फोटोग्राफी क्लाससाठी वापरले. सगळ्या नातेवाईकांना फेसबूक, ट्विटर आणि इंस्टाग्राम वर ब्लॉक केलं. सगळ्यांना वाटलं कि अभ्यासातून मन विचलित होऊ नये म्हणून तिने सगळं बंद केलं, त्यांना वाटलं आता ही पोरगी सुधारली, बाबांना अभिमान वाटला कि आता तरी नयना काही चांगलं करेल. पण नयनाची मात्र फोटोग्राफी जोरदार सुरु होती. तिने स्वत:चे फेसबुक पेज सुरु केले आणि काही ठिकाणी फ्रिलान्स फोटोग्राफर म्हणून काम ही करू लागली. आई-बाबा जेव्हा फोन करायचे तेव्हा दरवेळी तिला खोटं बोलावं लागायचं आणि ह्याचं तिला जरा वाईट पण वाटायचं. पण तिला दुसरा कुठला पर्याय माहित नव्हता. आणि खरी गडबड तर तेव्हा व्हायची जेव्हा ती आपण मागच्या वेळेस काय खोट बोलालोय् हे विसरून जायची. असं करता करता एक वर्ष सारून गेलं आणि मग तिच्या वडिलांनी मोठा बॉम्ब फोडला. भूमकर बाई (म्हणजे तिच्या चुलत आत्या) त्यांची मुलगी आता तिच्याच कॉलेज मध्ये शिकायला येणार असल्याची बातमी तिला समजली. आता नयनाला खरंच कुठल्यातरी masters programme ला अॅडमिशन घेणे आवश्यक बनले.

नयनाने ग्रॅज्युएशन विज्ञान शाखेतून केलं होतं पण आता मास्टर्स साठी पण जर विज्ञान निवडलं तर फोटोग्राफीसाठी वेळ मिळणार नाही म्हणून तिने कला शाखेत प्रवेश घ्यायचं ठरवलं. विज्ञान शाखेतून कला शाखेत ते ही एक वर्ष gap असताना अॅडमिशन घेणं काही सोप्पं नव्हतं. पण नयनाला अवघड गोष्टी सोप्प्या करून टाकायची सवय होती. तिने माहिती काढली आणि अॅडमिशन घ्यायला गेली. मास्टर्सच्या अॅडमिशनचं काम उप-प्राचार्य पाटील सर बघायचे. पाटील सर खूप साधे, भोळे आणि क्रीडा प्रेमी होते. त्यांना खोट बोललेलं आणि चालूगिरी केलेलं अजिब्बात आवडायचं नाही. अॅडमिशनच्या दिवशी नयना जुना पुराणा पंजाबी ड्रेस, बाथरूम स्लीपर्स आणि अजिब्बात मेक-अप न करता कॉलेजमध्ये गेली. तिच्या ह्या अवतारामुळे तिला कुणी ओळखलंच नाही. त्या दिवशी पाटील सरांच्या केबिन बाहेर मोठ्ठी रांग होती आणि हेड क्लार्क आगलावे पण तिथेच नवीन विद्यार्थ्यांच्या फॉर्म्स वर सह्या देत होते. नयना दबकत दबकत तिथे गेली आणि आपली कागद-पत्र देऊन अॅडमिशन मागितली. पण आगलावे नावाप्रमाणे आगलावेच होते, त्यांनी सरळ तिला नाही म्हटलं आणि हुडकावून लावलं. नयनाने हळूच बॅग मधून ग्लिसरीन काढून डोळ्यात टाकलं आणि हुंदके देत रडू लागली. ती सरळ पाटील सरांकडे गेली आणि त्यांचे पाय धरले. पाटील सरांनी तिची समजूत काढायचा प्रयत्न केला कि gap certificate शिवाय अॅडमिशन नाही मिळणार. मग नयनाने आपले गुप्त अस्त्र काढले. ती म्हणाली, “सर मी पण तुमच्या गावची, वडगावची आहे हो. खो-खो खेळते. major injury मुळे एक वर्ष वाया गेलं. मला अजून खेलायचंय, देशासाठी पदक मिळवायचंय. बाबांचं स्वप्न पूर्ण करायचंय!” हे ऐकल्यानंतर इमोशनल, क्रीडा प्रेमी आणि नुकतेच दंगल बघून आलेल्या पाटील सरांनापण गहिवरून आलं. “वडगावचं नाव चमकवणार आहे ही मुलगी आगलावे. द्या हिला अॅडमिशन.” पण आगलावे तो आगलावेच. पचकलाच. “अहो पण पाटील सर हिचे स्पोर्ट्सचे कुठलेच certificate किंवा documents नाहीयेत इथे.” दोन सेकंद भयानक शांतता. नयनाला वाटलं आपण अडकलो. आता काही खरं नाही. पण तितक्यात पाटील सरच म्हणाले, “अहो विसरली असेल ती…एक वर्ष इन्जुरी मुळे वाया गेलं आहे बिचारीच. आता अजून उशीर नका करू. द्या तिला अॅडमिशन.” आता मात्र नयनाला भरून आलं. तिने पाटील सरांचे पायच पकडले. आगलावेने पण नाईलाजास्तव तिला अॅडमिशन दिली.

नयना मग कॉलेजला फक्त परीक्षा असताना आणि कधी कधी तिच्या बहिणीला भेटण्याकरीता जायची. तिने मास्टर्स पण केलं आणि फोटोग्राफीचा कोर्ससुद्धा. पण आई-वडिलांना कधीच खरं काय ते सांगितलं नाही. आता मात्र ही गोष्ट लपवून काही उपयोग नव्हता. नयनाला खरं सांगायची हिम्मत नव्हती म्हणून तिने सगळी गोष्ट लिहून काढली. दुसऱ्या दिवशी पत्र वाचून आई-बाबा आले आणि नयनाने solid शिव्या खाल्ल्या. खोट बोलली म्हणून मरणाच्या दारात उभी आहेस हा अजब आरोप पण करून झाला. पण नयनाने आता प्रत्यक्ष माफी मागितली. laptop वर तिने केलेली कामे दाखवली. आईचा राग थोडा शांत झाला पण बाबांचा नाही. आता बाबांना मनावण्यासाठी काय करावं ह्याचा विचार नयना करू लागली…

क्रमशः

मृत्युपत्रं ३: घराला आग लागते तेव्हा…

बारावी झाल्यानंतर नयनाने आता दुसर्या शहरात जाऊन शिकायचं ठरवलं. एक वर्ष कॉलेजच्याच हॉस्टेलमध्ये राहिली पण ते काही तिला आवडलं नाही. तिच्या सारख्या खोडकर आणि स्वच्छंदी मुलीसाठी भलेमोठे नियम फलक असलेले हॉस्टेल एखाद्या जेलसारखेच वाटायचे. तरी हॉस्टेलमध्ये तिच्या प्रचंड खोडी चालायच्या. स्वत:ला लवकर अंघोळीला जाता यावं म्हणून मुलींच्या बादल्या लपवून ठेवायची, रूममेट्सच्या घरून आलेला खाऊ स्वत:च खाऊन टाकायची, हॉस्टेलच्या भिंती स्वत:चं घर असल्यासारख्या रंगवायची, कॉलेज कॅम्पस मधली भटकी कुत्री घेऊन यायची, वॉर्डनच्या बागेत सुतळी बॉम्ब फोडायची, मुलींच्या सायकल मधली हवाच सोडून ठेवायची, परवानगी नसतानाही इस्त्री-इंडक्शन प्लेट-laptop घेऊन आली होती आणि बरंच काय काय. दर आठवड्याला घरी तक्रारीचा एक तरी फोन जायचाच. शेवटी वैतागून वॉर्डननीच तिच्या आई-वडिलांना सांगितलं कि हिला घेऊन जा नाहीतर मी धक्के मारून बाहेर काढेन.

मग नयना आपल्या काही मैत्रिणींसोबत एक flat भाड्याने घेऊन राहू लागली. आता एकटं असल्याने स्वत:ची कामं स्वत: करायला लागायची त्यामुळे तिच्या खोड्यांचं प्रमाण जरा कमी झालं होतं. तरी सोसायटीतल्या लोकांसोबत भांडण्यात नयना सदैव पुढे असायची. लोक तिला आणि तिच्या मैत्रिणींना नेहमी नावं ठेवायचे आणि ह्या पोरींना सोसायटीतून कसं काढता येईल ह्याचा विचार करायचे. नयनाचे घर मालक म्हणजे तिच्या रूममेटचे दूरचे मामा आणि माजी नगरसेवक. एकदम गुंड माणूस. म्हणून त्यांच्याकडे तक्रार करायला कुणीच नाही जायचं.

नयनाचा विसावा वाढदिवस तिच्या मैत्रिणींनी जंगी पार्टी देऊन जोरदार साजरा केला. १०-१५ लोक घरी बोलावून दारू, चिकन, चिप्स आणि ड्रिंकिंग गेम्स असा जोरदार प्रोग्रॅम झाला. अख्ख्या घरात धिंगाणा घालत रात्री ३-४ च्या दरम्यान सगळे झोपून गेले. नयनाला नंतर जाग आली तेव्हा तिची एक मैत्रीण तिला गदागदा हलवत होती. खोलीत हळूहळू धूर भरू लागला होता. धूर पाहून नयनाची झोपच उडाली. घरातल्या एका बेडरूमला जोडून असलेल्या बाथरूमच्या इलेक्ट्रिक गिझर मधून धूर येत होता.

त्याचं झालं असं कि रात्री टल्ली होऊन नयना घरातली सगळी बटणं on-off करत सुटली होती. त्यात ते गिझरचं बटण सुरूच राहिलं आणि कुणाच्या लक्षातही आलं नाही. आता धुराने घर भरू लागलं तेव्हा सगळ्यांना जाग आली. एकाने बटण बंद केलं पण आता काही उपयोग नव्हता. नयना आता फोन काढून google वर ह्या प्रोब्लेमचं सोल्युशन शोधत होती. आणि तितक्यात धडाम असा आवाज आला. गिझरच्या बाजूला ठेवलेल्या deo च्या बाटल्या फुटल्या आणि आगीचा एक लोट बाथरूम मधून बाहेर पडला. आता कुणालाच समजेना काय करावे. किचन मधून तांब्या, ग्लास, कढई जे मिळेल त्यात पाणी आणून आग विझवण्याचा प्रयत्न केला जाऊ लागला. त्यात कुणीतरी पाणी समजून टकीला ओतली. आग काही कमी होईना. ह्यांचा गोंधळ आणि धूर बघून बिल्डींगमधले लोक जमा झाले. शेवटी अग्निशमन दलाला बोलावलं.

अग्निशमन दल येईपर्यंत १०-१५ मिनिटांचा वेळ होता. इतका वेळ नयनाने शांत बसणं तर शक्य नव्हतं. मग तिने फोन काढला आणि आगीसमोर उभं राहून वेगवेगळ्या पोझ मध्ये सेल्फी काढले. ग्रुप फोटो, सेल्फी, आगीत पाणी टाकून ती थांबवत असल्याची अॅक्शन करणारे फोटो, कुणाला तरी आगीत फेकत असल्याची पोझ आणि किती काय काय. ते फोटो काढून लगेच #burningout लिहून फेसबुक वर अपलोड पण केले. शेवटी एकदाचे अग्निशमन दलाचे जवान आले आणि त्यांनी आग विझवली. नंतर सोसायटी मधले सगळे म्हातारेकोतारे एकत्र येऊन नयना आणि तिच्या मैत्रिणींना टोमणे मारू लागले. कुणीतरी एक आजोबा एक ग्लास पाणी घेऊन आले आणि म्हणाले , “आता तुमच्या कडचं पाणी संपलं असेल ना म्हणून प्यायला आणलंय.” १० लोकांमध्ये एक ग्लास पाणी बघून नयना भडकली आणि सोसायटी मधले म्हातारे विरुद्ध नयना अशी भांडणाची जुगलबंदी रंगली.

ज्या खोलीतल्या बाथरूममधून आग लागली होती ती खोली जाळून काळी झाली होती. पुस्तकांचं एक कपाट, बेड आणि वर असलेलं सगळं सामान जाळून गेलं होतं. फक्त एक गोदरेजचं कपाट तेवढं चांगलं राहिलं होतं. सोसायटीमधले सगळे लोक येऊन जळालेली खोली बघून, उपदेशाचे डोस पाजून निघून गेले. दुपारून नयना आणि तिच्या मैत्रिणींनी सगळं घर स्वच्छ केलं. आगीची बातमी मिळाल्यावर संध्याकाळी घर मालक आले तेव्हा सगळ्या म्हाताऱ्यानी त्यांना खालीच गाठून sollid शिव्या घातल्या त्यामुळे त्यांची अजूनच सटकली. तावातावात ते घरात शिरले. सगळ्यांना ओरडत जळालेल्या खोलीत गेले आणि त्यांची बोलतीच बंद झाली. नयनाने काळ्या भिंतींवर बोटाने भयंकर सुविचार लिहून ठेवले होते. यहां पेशाब करना मना है; गप्पी मासे पाळा हिवताप टाळा; मुलगी शिकली प्रगती झाली; नेहमी खरे बोलावे; चलो आझाद मैदान. हे बघून घर मालकांना आता काय बोलावं सुचेना. त्यांनी भितीकडे पाहिलं, पोरांकडे पाहिलं, काहीतरी बोलायला तोंड उघडलं पण काही न बोलता ‘ह्यांचं काही होणार नाही’ असे expressions देत ते निघून गेले. महिन्याभरात घराला नवीन रंग लागला आणि सगळं जैसे थे झालं!

हॉस्पिटलमध्ये आपल्याच floor वर असलेल्या burn unit कडे बघून नयनाला जाणीव झाली कि अग्निशमन दलाचे तिच्यावर किती उपकार आहेत ते. तिच्या खोड्यांमुळे होऊ घातलेली जीवित हानी दोन वेळा अग्निशमन दलामुळेच टळली. म्हणून तिने तिच्या बॅंकेतील सगळे पैसे, तिचे savings आणि insurance मधून मिळणारी अर्धी रक्कम अग्निशमन दलाला donate केली. तसे रीतसर पत्र तिने बॅंकेला, अग्निशमन दलाला आणि तिच्या पालकांना लिहिले. ह्याने तिच्यातील खोड्या करण्याची आग तर विझणार नव्हती पण तरी तिला एक मानसिक समाधान मिळाले.

क्रमशः

मृत्युपत्रं २: ड्रेनेजमध्ये अडकलेल्या कुत्र्याची गोष्ट…

नयनाला कारण नसताना लोकांना त्रास द्यायची भारी हौस होती. तिला कुठे हि कुठल्याही खोड्या दिसायच्या. तिला नेहमीच एक कुत्रा पाळायचा होता. किंवा मांजर किंवा बेडूक किंवा कासव किंवा ससा किंवा पक्षी किंवा मासे. पण तिच्या खोडकर स्वभावाची पुरेपूर माहिती असलेल्या तिच्या घरच्यांनी तिला कधीच परवानगी दिली नाही. त्यामुळे ती कॉलनीतल्या कुत्र्यांसोबत खेळायची, मस्ती करायची. मस्ती म्हणजे छळायचीच. त्यांच्या शेपटीला टीनचे डब्बे बांधायची, त्यांना चिखलात फेकायची, त्यांच्यावर पाणी उडवायची पण प्रेम हि तितकंच करायची. पॉकेट मनी मधले पैसे वाचवून महिन्यातून एकदा त्यांच्यासाठी स्पेशल डॉग फूड आणायची. शाहीदच्या घरून चिकन/मटणची हाडं आणायची आणि आई-बाबांची नजर चोरून कुत्र्यांना खाऊ घालायची. कुणाला बर नसेल तर त्यांच्या मालकांना चौकशीचे दहा हजार फोन करायची. तिच्या ह्या चांगुलपणामुळे लोक तिच्या प्राण्यांसोबतच्या खोड्या adjust करून घ्यायचे.

एकदा कॉलनीत एक नवीन बिर्हाड आलं. त्यांच्याकडे एक गोलमटोल पांढर शुभ्र कापसाचा बोळा वाटावं असं पामेरियन कुत्रं होतं. कुत्रं भारी शिष्ट होतं. ते राजा असल्याचा ऐटीत फिरायचं. फक्त महागड्या चारचाकी गाड्यांच्या टायर वरच शू करायचं, बाकी कुत्र्यांसोबत उद्या मारायला किंवा बागडायला त्याला आवडायचं नाही. आणि सगळ्यात कहर म्हणजे तो नयनाला काही भिक घाले ना. ना तिच्या जवळ येई, ना तिने दिलेलं काही खाई, ती खोडी काढायला आली कि लगेच आपल्या मालकाच्या दिशेने सुसाट पळून जाई. नयनाला आता त्याचा भारी राग येऊ लागला. ती रोज त्याच्या जवळ जायच्या वेगवेगळ्या क्लुप्त्या काधी पण तो काही तिच्या हाती लागायचा नाही.

आणि मग पावसाळा सुरु झाला. सगळी कुत्री पाउस थांबला कि बाहेर पडायची पण हा मात्र पावसात बाहेर पडायचा. पठ्ठ्याला पावसात भिजायला खूप आवडायचं. कॉलनीतल्या बागेच्या कडेने ड्रेनेज ची लाईन होती. त्यावर जाळीची सिमेंटची झाकणं. एक दिवस ड्रेनेज साफ करायला आलेल्या कामगारांनी सफाई तर केली पण काही झाकणं उघडी ठेवून गेले. त्या ड्रेनेजच्या वाहणाऱ्या पाण्यात पडणारे पावसाचे टपोरे थेंब बघत थांबायला श्वान राजास प्रचंड आवडायचे. तो ते बघण्यात गुंग होऊन जायचा. एक दिवस नयनाला तो असाच पाण्यात बघत असताना दिसला. तिने मौके पे चौका मारायचं ठरवलं. ती हळूच त्याच्या मागे जाऊन उभी राहिली. कुत्रोबा पाणी पाहण्यात इतके मग्न होते कि त्यांच्या लक्षातच आलं नाही कि कुणीतरी आपल्या मागे उभं आहे. त्याच्या मागे उभं राहून नयनाला त्याने आपल्याला भिक न घालून केलेल्या अपमानांचे flash जाऊ लागले आणि मग रागाच्या भरात तिने त्याला एक सणसणीत लाथ घातली आणि बाहेर पळून गेली.

नयना मैत्रिणींसोबत पिक्चर बघून, जेवून, पावसात भिजून आरामात चार पाच तासांनंतर परतली. आणि बघते तर बागे भोवती ही तोबा गर्दी जमलेली. गर्दीतून मार्ग काढत काढत ती नक्की काय चाललंय बघायला गेली आणि समोर जे दिसलं ते बघून ती जोरजोरात हसायला लागली. ज्या श्वान राजास तिने लाथ घातली होती ते बिचारे द्रेनेज्मध्ये अडकले होते. त्याचं झालं असं कि नयना त्याला लाथ मारून जी पळाली ते तिने मागे वळून पाहिलंच नाही. कुत्रोबा बिचारे ड्रेनेज मध्ये पडले पण पूर्ण नाही. त्यांचं पुढंच अर्ध शरीर ड्रेनेज मध्ये आणि मागचं बाहेर. तंगड्या फाकवून, आपली झुपकेदार शेपटी हलवत साहेबांचं कण्हण सुरु होतं. त्यांचा आवाज ऐकून आधी वॉचमन, मग त्यांचे मालक, मग कॉलनीतले श्वान प्रेमी आणि शेवटी सगळी कॉलनीच जमा झाली होती. त्यांना बाहेर काढण्याचे खूप प्रयत्न करून झाले पण फेविकॉल का जोड असल्या सारखे ते काही निघेचना. शेवटी प्राणीमित्र संघटनेच्या काही कार्यकर्त्यांना बोलावले पण त्यांचे प्रयत्न हि थकले.

नयनाला मात्र ह्या प्रकाराची भारी गम्मत वाटत होती. काही लोकांनी नयनाचं हसण पाहून तिला बिन हृदयाची, कठोर मनाची, असंवेदनशील, आजची पिढी इत्यादी इत्यादी विशेषणं लावून नावं ठेवली. पण कुणालाच आता काय करावे सुचेना. शेवटी नयनानेच आता अग्निशमन दलाला बोलवा असे सुचवले. त्याप्रमाणे लगेच लाल रंगाची हे एवढी मोठ्ठी गाडी एवधुश्या प्राण्यास वाचवण्यास सरसावली. अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नांच्या नंतर त्यांना यश प्राप्त झाले आणि श्वान राजा आपल्या अनैच्छिक कैदेतून सुटले. सुटल्या क्षणी त्यांनी नयनावर भुंकायला सुरुवात केली. त्यांच्या मालकांनी नयनानेच कुत्रोबांना ड्रेनेज मध्ये ढकलले असा आरोप केला. नयनाला वाईट वाटलं. आरोप केला ह्याचं नाही हो,  तर तो आरोप इतक्या handsome आणि muscular अग्निशमन दलाच्या जवानांसमोर केला म्हणून. पण नयनाने सर्व आरोप धुडकावून लावले.

कॉलनीच्या पुढच्या मिटींगमध्ये ड्रेनेजला कायमस्वरूपी झाकणं लावण्याचा प्रस्ताव पास झाला आणि परत काही कारणांनी अशी कुठली घटना घडू नये म्हणून सोसायटीने कुत्रे पाळण्यावर बंदी घातली. सर्व श्वान प्रेमी रहिवाश्यांनी ह्याला विरोध केला पण तो कमीच पडला. मग काय कुत्रोबा त्यांच्या हायफाय मालकांसोबत कॉलनीसोडून निघून गेले. नयनाला खूप वाईट वाटलं. पण तेव्हा खरं सांगण्या इतकी हिम्मत नव्हती.

आता रोज हॉस्पिटलमध्ये एकाच बेडवर अडकून पडलेल्या नयनाला जाणवलं कि तेव्हा कुत्रोबांना कसं वाटलं असेल. नयनाने आता मात्र तिची चूक कबूल करायचं ठरवलं. तिने एका पत्रात सगळा घटनाक्रम लिहून माफी मागितली. त्या पत्राची एक कॉपी कॉलनीच्या तत्कालीन आणि सध्याच्या अध्यक्षांना पाठवली तर एक कॉपी त्या श्वान राजांच्या मालकांना. कॉलनीत कुत्रे न पाळण्याचा नियम रद्द करण्यात आला आणि नयनाने सुटकेचा नि:श्वास टाकला.

क्रमश:

मृत्युपत्रं १: भूमकर बाईंनी चावलेली मुलगी

नयना एकदम खतरनाक character होती. लहान पणापासूनच विचित्र वागायची. सुमडीत कोंबडी म्हणतात न तसं. तिच्याकडे तिच्या किश्श्यांची हे भली मोठी जंत्री होती. शाळेत असताना बडबडी म्हणून सगळे तिला ओळखायचे. अभ्यासात किंवा खेळात विशेष हुशार नव्हती ती पण अगदी ढ पण नव्हती. मध्यम category मधली मुलं असतात ना तशीच होती ती. पण भारी खोडकर.

एकदा शाळेतून घरी आली आणि अति उत्साहात आपल्या आईला सांगितलं, “आज भूमकर बाई एका मुलीला चावल्या.” आणि फटक… बाबांनी तिच्या कानशिलावर एक जोरदार टेकवली. “गधडे चुलत आत्या आहे ती तुझी. लाज नाही वाटत असं बोलताना?” तेव्हा नयनाला अचानक आठवलं कि भूमकर बाई आपल्या चुलत आत्या आहेत आणि त्यांच्याबद्दल आपण (कदाचित) एक खतरनाक अफवा पसरवून आलो आहोत.

भूमकर बाई शाळेतल्या सगळ्यात गबाळ्या बाई. ज्या रुमालाने सदैव गळणार नाक पुसायच्या त्याच रुमालाने चष्मा पुसायच्या. एकदा त्यांच्या भूगोलाच्या तासाला नयना खूपच कंटाळली. मग तिने हळूच वहीतल्या कागदांची विमानं करून वर्गात उडवायला सुरुवात केली. एक विमान नेमकं पहिल्या बाकावर प्रांजलीच्या पुढ्यात जाऊन पडलं. प्रांजलीने साळसुद्पणे ते आपल्या हातात घेतलं आणि तितक्यात भूमकर बाईनी पाहिलं. मग काय त्यांचा भडकाच उडाला. रागाच्या भरात त्यांनी तिच्यावर हात उचलला आणि तो चुकवायच्या नादात प्रांजली एका बाजूला कलली पण तिच्या बाकाच्या विचित्र आकारामुळे तिचा तोल गेला आणि ती भूमकर बाईंवर almost पडली. तिचा हात भूमकर बाईंच्या चेहर्यावर आणि त्यांचे हात तिच्या दंडांवर. ह्यात नयनाच्या 3d नजरेची कमाल झाली आणि तिला वाटलं कि भूमकर बाई प्रांजलीला चावल्या. मग काय तास संपल्यानंतर सगळ्या वर्गात तीच चर्चा. नयना तिच्या 3d नजरेवर मनातून नसली तरी सर्वांसमोर बोलायला इतकी ठाम कि हळूहळू प्रांजालीला पण वाटू लागलं कि भूमकर बाई खरंच आपल्याला चावल्या. मधल्या सुट्टीत सगळ्या शाळेत हि बातमी वणव्यासारखी पसरली. सगळी शाळा “भूमकर बाईनी चावलेली मुलगी” बघायला ह्यांच्या वर्गासमोर. आता बिचारी प्रांजली इतकी panic झाली कि रडायलाच लागली. एकीकडे प्रांजली वर्गात रडत होती तर दुसरीकडे भूमकर बाई मुख्याध्यापकांसमोर. प्रांजलीच्या आई वडिलांना बोलावलं. मधली सुट्टी संपल्यानंतर भूमकर बाई, मुख्याध्यापिका, पर्यवेक्षिका, प्रांजलीचे पालक, संस्थेचे पदाधिकारी सगळे नयनाच्या वर्गात गोळा झाले. आता इतक्या वेळात इतक्या मुलींनी प्रांजलीचा हात पहिला होता आणि तिने तो इतका वेळ घट्ट धरला होता कि तो लाल लाल झाला. सगळ्यांना वाटलं बाई चावल्यामुळे झाला हिचा हात लाल. चर्चा, रडारड, तक्रारी सगळं होऊन दोन दिवसानंतर शेवटी भूमकर बाईना राजीनामा द्यावा लागला. आता दोन दिवसानंतर नयना पण confuse झाली कि तिच्या 3d नजरेने पाहिलं ते खरं कि खोटं.

पण आता ८ वर्षानंतर तिला जाणवलंय कि ती जे वागली ते चुकीचं होतं. म्हणून तिने पाहिलं पत्र भूमकर बाईना लिहायचं ठरवलं. खरं सांगून त्यांची माफी मागितली. त्या पत्राची एक एक copy संस्थेला आणि प्रांजलीच्या आई वडिलांना देऊन एकदाचा “भूमकर बाई एका मुलीला चावल्या” ह्या गोष्टीचा सोक्ष मोक्ष लावला. आता स्वत: मोक्षाच्या वाटेवर लागलेली असताना दुसरं करणार तरी काय ती. आयुष्यभर जे काही बोलायचं टाळल ते आता उरलेल्या काही दिवसांत अशी अनेक मृत्युपत्र लिहून बोलून टाकायचं ठरवलं. शेवटी मृत्युसमोर सगळ माफ असत. त्यामुळे आपल्याच सोबत असं का झालं ह्याचा विचार करायचा सोडून तिने laptop आणि चार्जर मागवून घेतला, आपली मृत्यूपत्रं लिहायला.

क्रमशः

A WordPress.com Website.

Up ↑

%d bloggers like this: