मृत्युपत्रं ४: शिक्षणाचा बट्ट्याबोळ…

नयनाने ग्रॅज्युएशन पूर्ण केले तेव्हा सगळ्यात जास्त आनंद तिच्या आजीला झाला. आता तिच्या आजीने हिच लवकरात लवकर लग्न लावून टाका असं फर्मान सोडलं आणि ते तिच्या आईला ही पटलं. लग्न झालं, जबाबदारी पडली कि ही पोरगी सुतासारखी सरळ होईल असं त्यांचं मत होतं. पण तिच्या वडिलांना मात्र हे पटेना. आपली पोरगी कितीही बदमाश असली तरी तिला सरळ करण्यासाठी लग्न हा उपाय नाही असं त्यांचं मत होतं. तिने पुढे शिकावं, स्वत:च्या पायावर उभं राहावं असं त्यांना वाटायचं. नयनाला बाबा तिच्या बाजूने असल्याने आई आणि आजीशी भांडायला जरा सोप्पं जात होतं. पण तरी कुठेतरी माशी शिंकलीच! नयनाला फॅशन फोटोग्राफर बनायचं होतं तर तिच्या वडिलांची इच्छा होती कि तिने IAS किंवा IFS करून आपलं सरकारी अधिकारी बनण्याचं स्वप्न पूर्ण करावं. ह्यावर नयना त्यांच्याशी भांडली आणि ते भांडण इतकं विकोपाला गेलं कि शेवटी तिच्यासमोर दोनच पर्याय उरले: IAS किंवा IFS चा अभ्यास करायला जायचं किंवा लग्न करायचं. नयनाने घरच्यांसमोर पहिला पर्याय मान्य केला.

पण शहरात आल्यावर मात्र तिने तेच केले जे तिला करायचे होते. बाबांनी स्पर्धा परीक्षांच्या क्लाससाठी आणि त्याचसोबत सलग मास्टर्स करण्यासाठी दिलेले पैसे तिने फोटोग्राफी क्लाससाठी वापरले. सगळ्या नातेवाईकांना फेसबूक, ट्विटर आणि इंस्टाग्राम वर ब्लॉक केलं. सगळ्यांना वाटलं कि अभ्यासातून मन विचलित होऊ नये म्हणून तिने सगळं बंद केलं, त्यांना वाटलं आता ही पोरगी सुधारली, बाबांना अभिमान वाटला कि आता तरी नयना काही चांगलं करेल. पण नयनाची मात्र फोटोग्राफी जोरदार सुरु होती. तिने स्वत:चे फेसबुक पेज सुरु केले आणि काही ठिकाणी फ्रिलान्स फोटोग्राफर म्हणून काम ही करू लागली. आई-बाबा जेव्हा फोन करायचे तेव्हा दरवेळी तिला खोटं बोलावं लागायचं आणि ह्याचं तिला जरा वाईट पण वाटायचं. पण तिला दुसरा कुठला पर्याय माहित नव्हता. आणि खरी गडबड तर तेव्हा व्हायची जेव्हा ती आपण मागच्या वेळेस काय खोट बोलालोय् हे विसरून जायची. असं करता करता एक वर्ष सारून गेलं आणि मग तिच्या वडिलांनी मोठा बॉम्ब फोडला. भूमकर बाई (म्हणजे तिच्या चुलत आत्या) त्यांची मुलगी आता तिच्याच कॉलेज मध्ये शिकायला येणार असल्याची बातमी तिला समजली. आता नयनाला खरंच कुठल्यातरी masters programme ला अॅडमिशन घेणे आवश्यक बनले.

नयनाने ग्रॅज्युएशन विज्ञान शाखेतून केलं होतं पण आता मास्टर्स साठी पण जर विज्ञान निवडलं तर फोटोग्राफीसाठी वेळ मिळणार नाही म्हणून तिने कला शाखेत प्रवेश घ्यायचं ठरवलं. विज्ञान शाखेतून कला शाखेत ते ही एक वर्ष gap असताना अॅडमिशन घेणं काही सोप्पं नव्हतं. पण नयनाला अवघड गोष्टी सोप्प्या करून टाकायची सवय होती. तिने माहिती काढली आणि अॅडमिशन घ्यायला गेली. मास्टर्सच्या अॅडमिशनचं काम उप-प्राचार्य पाटील सर बघायचे. पाटील सर खूप साधे, भोळे आणि क्रीडा प्रेमी होते. त्यांना खोट बोललेलं आणि चालूगिरी केलेलं अजिब्बात आवडायचं नाही. अॅडमिशनच्या दिवशी नयना जुना पुराणा पंजाबी ड्रेस, बाथरूम स्लीपर्स आणि अजिब्बात मेक-अप न करता कॉलेजमध्ये गेली. तिच्या ह्या अवतारामुळे तिला कुणी ओळखलंच नाही. त्या दिवशी पाटील सरांच्या केबिन बाहेर मोठ्ठी रांग होती आणि हेड क्लार्क आगलावे पण तिथेच नवीन विद्यार्थ्यांच्या फॉर्म्स वर सह्या देत होते. नयना दबकत दबकत तिथे गेली आणि आपली कागद-पत्र देऊन अॅडमिशन मागितली. पण आगलावे नावाप्रमाणे आगलावेच होते, त्यांनी सरळ तिला नाही म्हटलं आणि हुडकावून लावलं. नयनाने हळूच बॅग मधून ग्लिसरीन काढून डोळ्यात टाकलं आणि हुंदके देत रडू लागली. ती सरळ पाटील सरांकडे गेली आणि त्यांचे पाय धरले. पाटील सरांनी तिची समजूत काढायचा प्रयत्न केला कि gap certificate शिवाय अॅडमिशन नाही मिळणार. मग नयनाने आपले गुप्त अस्त्र काढले. ती म्हणाली, “सर मी पण तुमच्या गावची, वडगावची आहे हो. खो-खो खेळते. major injury मुळे एक वर्ष वाया गेलं. मला अजून खेलायचंय, देशासाठी पदक मिळवायचंय. बाबांचं स्वप्न पूर्ण करायचंय!” हे ऐकल्यानंतर इमोशनल, क्रीडा प्रेमी आणि नुकतेच दंगल बघून आलेल्या पाटील सरांनापण गहिवरून आलं. “वडगावचं नाव चमकवणार आहे ही मुलगी आगलावे. द्या हिला अॅडमिशन.” पण आगलावे तो आगलावेच. पचकलाच. “अहो पण पाटील सर हिचे स्पोर्ट्सचे कुठलेच certificate किंवा documents नाहीयेत इथे.” दोन सेकंद भयानक शांतता. नयनाला वाटलं आपण अडकलो. आता काही खरं नाही. पण तितक्यात पाटील सरच म्हणाले, “अहो विसरली असेल ती…एक वर्ष इन्जुरी मुळे वाया गेलं आहे बिचारीच. आता अजून उशीर नका करू. द्या तिला अॅडमिशन.” आता मात्र नयनाला भरून आलं. तिने पाटील सरांचे पायच पकडले. आगलावेने पण नाईलाजास्तव तिला अॅडमिशन दिली.

नयना मग कॉलेजला फक्त परीक्षा असताना आणि कधी कधी तिच्या बहिणीला भेटण्याकरीता जायची. तिने मास्टर्स पण केलं आणि फोटोग्राफीचा कोर्ससुद्धा. पण आई-वडिलांना कधीच खरं काय ते सांगितलं नाही. आता मात्र ही गोष्ट लपवून काही उपयोग नव्हता. नयनाला खरं सांगायची हिम्मत नव्हती म्हणून तिने सगळी गोष्ट लिहून काढली. दुसऱ्या दिवशी पत्र वाचून आई-बाबा आले आणि नयनाने solid शिव्या खाल्ल्या. खोट बोलली म्हणून मरणाच्या दारात उभी आहेस हा अजब आरोप पण करून झाला. पण नयनाने आता प्रत्यक्ष माफी मागितली. laptop वर तिने केलेली कामे दाखवली. आईचा राग थोडा शांत झाला पण बाबांचा नाही. आता बाबांना मनावण्यासाठी काय करावं ह्याचा विचार नयना करू लागली…

क्रमशः

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s