मृत्युपत्रं ३: घराला आग लागते तेव्हा…

बारावी झाल्यानंतर नयनाने आता दुसर्या शहरात जाऊन शिकायचं ठरवलं. एक वर्ष कॉलेजच्याच हॉस्टेलमध्ये राहिली पण ते काही तिला आवडलं नाही. तिच्या सारख्या खोडकर आणि स्वच्छंदी मुलीसाठी भलेमोठे नियम फलक असलेले हॉस्टेल एखाद्या जेलसारखेच वाटायचे. तरी हॉस्टेलमध्ये तिच्या प्रचंड खोडी चालायच्या. स्वत:ला लवकर अंघोळीला जाता यावं म्हणून मुलींच्या बादल्या लपवून ठेवायची, रूममेट्सच्या घरून आलेला खाऊ स्वत:च खाऊन टाकायची, हॉस्टेलच्या भिंती स्वत:चं घर असल्यासारख्या रंगवायची, कॉलेज कॅम्पस मधली भटकी कुत्री घेऊन यायची, वॉर्डनच्या बागेत सुतळी बॉम्ब फोडायची, मुलींच्या सायकल मधली हवाच सोडून ठेवायची, परवानगी नसतानाही इस्त्री-इंडक्शन प्लेट-laptop घेऊन आली होती आणि बरंच काय काय. दर आठवड्याला घरी तक्रारीचा एक तरी फोन जायचाच. शेवटी वैतागून वॉर्डननीच तिच्या आई-वडिलांना सांगितलं कि हिला घेऊन जा नाहीतर मी धक्के मारून बाहेर काढेन.

मग नयना आपल्या काही मैत्रिणींसोबत एक flat भाड्याने घेऊन राहू लागली. आता एकटं असल्याने स्वत:ची कामं स्वत: करायला लागायची त्यामुळे तिच्या खोड्यांचं प्रमाण जरा कमी झालं होतं. तरी सोसायटीतल्या लोकांसोबत भांडण्यात नयना सदैव पुढे असायची. लोक तिला आणि तिच्या मैत्रिणींना नेहमी नावं ठेवायचे आणि ह्या पोरींना सोसायटीतून कसं काढता येईल ह्याचा विचार करायचे. नयनाचे घर मालक म्हणजे तिच्या रूममेटचे दूरचे मामा आणि माजी नगरसेवक. एकदम गुंड माणूस. म्हणून त्यांच्याकडे तक्रार करायला कुणीच नाही जायचं.

नयनाचा विसावा वाढदिवस तिच्या मैत्रिणींनी जंगी पार्टी देऊन जोरदार साजरा केला. १०-१५ लोक घरी बोलावून दारू, चिकन, चिप्स आणि ड्रिंकिंग गेम्स असा जोरदार प्रोग्रॅम झाला. अख्ख्या घरात धिंगाणा घालत रात्री ३-४ च्या दरम्यान सगळे झोपून गेले. नयनाला नंतर जाग आली तेव्हा तिची एक मैत्रीण तिला गदागदा हलवत होती. खोलीत हळूहळू धूर भरू लागला होता. धूर पाहून नयनाची झोपच उडाली. घरातल्या एका बेडरूमला जोडून असलेल्या बाथरूमच्या इलेक्ट्रिक गिझर मधून धूर येत होता.

त्याचं झालं असं कि रात्री टल्ली होऊन नयना घरातली सगळी बटणं on-off करत सुटली होती. त्यात ते गिझरचं बटण सुरूच राहिलं आणि कुणाच्या लक्षातही आलं नाही. आता धुराने घर भरू लागलं तेव्हा सगळ्यांना जाग आली. एकाने बटण बंद केलं पण आता काही उपयोग नव्हता. नयना आता फोन काढून google वर ह्या प्रोब्लेमचं सोल्युशन शोधत होती. आणि तितक्यात धडाम असा आवाज आला. गिझरच्या बाजूला ठेवलेल्या deo च्या बाटल्या फुटल्या आणि आगीचा एक लोट बाथरूम मधून बाहेर पडला. आता कुणालाच समजेना काय करावे. किचन मधून तांब्या, ग्लास, कढई जे मिळेल त्यात पाणी आणून आग विझवण्याचा प्रयत्न केला जाऊ लागला. त्यात कुणीतरी पाणी समजून टकीला ओतली. आग काही कमी होईना. ह्यांचा गोंधळ आणि धूर बघून बिल्डींगमधले लोक जमा झाले. शेवटी अग्निशमन दलाला बोलावलं.

अग्निशमन दल येईपर्यंत १०-१५ मिनिटांचा वेळ होता. इतका वेळ नयनाने शांत बसणं तर शक्य नव्हतं. मग तिने फोन काढला आणि आगीसमोर उभं राहून वेगवेगळ्या पोझ मध्ये सेल्फी काढले. ग्रुप फोटो, सेल्फी, आगीत पाणी टाकून ती थांबवत असल्याची अॅक्शन करणारे फोटो, कुणाला तरी आगीत फेकत असल्याची पोझ आणि किती काय काय. ते फोटो काढून लगेच #burningout लिहून फेसबुक वर अपलोड पण केले. शेवटी एकदाचे अग्निशमन दलाचे जवान आले आणि त्यांनी आग विझवली. नंतर सोसायटी मधले सगळे म्हातारेकोतारे एकत्र येऊन नयना आणि तिच्या मैत्रिणींना टोमणे मारू लागले. कुणीतरी एक आजोबा एक ग्लास पाणी घेऊन आले आणि म्हणाले , “आता तुमच्या कडचं पाणी संपलं असेल ना म्हणून प्यायला आणलंय.” १० लोकांमध्ये एक ग्लास पाणी बघून नयना भडकली आणि सोसायटी मधले म्हातारे विरुद्ध नयना अशी भांडणाची जुगलबंदी रंगली.

ज्या खोलीतल्या बाथरूममधून आग लागली होती ती खोली जाळून काळी झाली होती. पुस्तकांचं एक कपाट, बेड आणि वर असलेलं सगळं सामान जाळून गेलं होतं. फक्त एक गोदरेजचं कपाट तेवढं चांगलं राहिलं होतं. सोसायटीमधले सगळे लोक येऊन जळालेली खोली बघून, उपदेशाचे डोस पाजून निघून गेले. दुपारून नयना आणि तिच्या मैत्रिणींनी सगळं घर स्वच्छ केलं. आगीची बातमी मिळाल्यावर संध्याकाळी घर मालक आले तेव्हा सगळ्या म्हाताऱ्यानी त्यांना खालीच गाठून sollid शिव्या घातल्या त्यामुळे त्यांची अजूनच सटकली. तावातावात ते घरात शिरले. सगळ्यांना ओरडत जळालेल्या खोलीत गेले आणि त्यांची बोलतीच बंद झाली. नयनाने काळ्या भिंतींवर बोटाने भयंकर सुविचार लिहून ठेवले होते. यहां पेशाब करना मना है; गप्पी मासे पाळा हिवताप टाळा; मुलगी शिकली प्रगती झाली; नेहमी खरे बोलावे; चलो आझाद मैदान. हे बघून घर मालकांना आता काय बोलावं सुचेना. त्यांनी भितीकडे पाहिलं, पोरांकडे पाहिलं, काहीतरी बोलायला तोंड उघडलं पण काही न बोलता ‘ह्यांचं काही होणार नाही’ असे expressions देत ते निघून गेले. महिन्याभरात घराला नवीन रंग लागला आणि सगळं जैसे थे झालं!

हॉस्पिटलमध्ये आपल्याच floor वर असलेल्या burn unit कडे बघून नयनाला जाणीव झाली कि अग्निशमन दलाचे तिच्यावर किती उपकार आहेत ते. तिच्या खोड्यांमुळे होऊ घातलेली जीवित हानी दोन वेळा अग्निशमन दलामुळेच टळली. म्हणून तिने तिच्या बॅंकेतील सगळे पैसे, तिचे savings आणि insurance मधून मिळणारी अर्धी रक्कम अग्निशमन दलाला donate केली. तसे रीतसर पत्र तिने बॅंकेला, अग्निशमन दलाला आणि तिच्या पालकांना लिहिले. ह्याने तिच्यातील खोड्या करण्याची आग तर विझणार नव्हती पण तरी तिला एक मानसिक समाधान मिळाले.

क्रमशः

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s