मृत्युपत्रं २: ड्रेनेजमध्ये अडकलेल्या कुत्र्याची गोष्ट…

नयनाला कारण नसताना लोकांना त्रास द्यायची भारी हौस होती. तिला कुठे हि कुठल्याही खोड्या दिसायच्या. तिला नेहमीच एक कुत्रा पाळायचा होता. किंवा मांजर किंवा बेडूक किंवा कासव किंवा ससा किंवा पक्षी किंवा मासे. पण तिच्या खोडकर स्वभावाची पुरेपूर माहिती असलेल्या तिच्या घरच्यांनी तिला कधीच परवानगी दिली नाही. त्यामुळे ती कॉलनीतल्या कुत्र्यांसोबत खेळायची, मस्ती करायची. मस्ती म्हणजे छळायचीच. त्यांच्या शेपटीला टीनचे डब्बे बांधायची, त्यांना चिखलात फेकायची, त्यांच्यावर पाणी उडवायची पण प्रेम हि तितकंच करायची. पॉकेट मनी मधले पैसे वाचवून महिन्यातून एकदा त्यांच्यासाठी स्पेशल डॉग फूड आणायची. शाहीदच्या घरून चिकन/मटणची हाडं आणायची आणि आई-बाबांची नजर चोरून कुत्र्यांना खाऊ घालायची. कुणाला बर नसेल तर त्यांच्या मालकांना चौकशीचे दहा हजार फोन करायची. तिच्या ह्या चांगुलपणामुळे लोक तिच्या प्राण्यांसोबतच्या खोड्या adjust करून घ्यायचे.

एकदा कॉलनीत एक नवीन बिर्हाड आलं. त्यांच्याकडे एक गोलमटोल पांढर शुभ्र कापसाचा बोळा वाटावं असं पामेरियन कुत्रं होतं. कुत्रं भारी शिष्ट होतं. ते राजा असल्याचा ऐटीत फिरायचं. फक्त महागड्या चारचाकी गाड्यांच्या टायर वरच शू करायचं, बाकी कुत्र्यांसोबत उद्या मारायला किंवा बागडायला त्याला आवडायचं नाही. आणि सगळ्यात कहर म्हणजे तो नयनाला काही भिक घाले ना. ना तिच्या जवळ येई, ना तिने दिलेलं काही खाई, ती खोडी काढायला आली कि लगेच आपल्या मालकाच्या दिशेने सुसाट पळून जाई. नयनाला आता त्याचा भारी राग येऊ लागला. ती रोज त्याच्या जवळ जायच्या वेगवेगळ्या क्लुप्त्या काधी पण तो काही तिच्या हाती लागायचा नाही.

आणि मग पावसाळा सुरु झाला. सगळी कुत्री पाउस थांबला कि बाहेर पडायची पण हा मात्र पावसात बाहेर पडायचा. पठ्ठ्याला पावसात भिजायला खूप आवडायचं. कॉलनीतल्या बागेच्या कडेने ड्रेनेज ची लाईन होती. त्यावर जाळीची सिमेंटची झाकणं. एक दिवस ड्रेनेज साफ करायला आलेल्या कामगारांनी सफाई तर केली पण काही झाकणं उघडी ठेवून गेले. त्या ड्रेनेजच्या वाहणाऱ्या पाण्यात पडणारे पावसाचे टपोरे थेंब बघत थांबायला श्वान राजास प्रचंड आवडायचे. तो ते बघण्यात गुंग होऊन जायचा. एक दिवस नयनाला तो असाच पाण्यात बघत असताना दिसला. तिने मौके पे चौका मारायचं ठरवलं. ती हळूच त्याच्या मागे जाऊन उभी राहिली. कुत्रोबा पाणी पाहण्यात इतके मग्न होते कि त्यांच्या लक्षातच आलं नाही कि कुणीतरी आपल्या मागे उभं आहे. त्याच्या मागे उभं राहून नयनाला त्याने आपल्याला भिक न घालून केलेल्या अपमानांचे flash जाऊ लागले आणि मग रागाच्या भरात तिने त्याला एक सणसणीत लाथ घातली आणि बाहेर पळून गेली.

नयना मैत्रिणींसोबत पिक्चर बघून, जेवून, पावसात भिजून आरामात चार पाच तासांनंतर परतली. आणि बघते तर बागे भोवती ही तोबा गर्दी जमलेली. गर्दीतून मार्ग काढत काढत ती नक्की काय चाललंय बघायला गेली आणि समोर जे दिसलं ते बघून ती जोरजोरात हसायला लागली. ज्या श्वान राजास तिने लाथ घातली होती ते बिचारे द्रेनेज्मध्ये अडकले होते. त्याचं झालं असं कि नयना त्याला लाथ मारून जी पळाली ते तिने मागे वळून पाहिलंच नाही. कुत्रोबा बिचारे ड्रेनेज मध्ये पडले पण पूर्ण नाही. त्यांचं पुढंच अर्ध शरीर ड्रेनेज मध्ये आणि मागचं बाहेर. तंगड्या फाकवून, आपली झुपकेदार शेपटी हलवत साहेबांचं कण्हण सुरु होतं. त्यांचा आवाज ऐकून आधी वॉचमन, मग त्यांचे मालक, मग कॉलनीतले श्वान प्रेमी आणि शेवटी सगळी कॉलनीच जमा झाली होती. त्यांना बाहेर काढण्याचे खूप प्रयत्न करून झाले पण फेविकॉल का जोड असल्या सारखे ते काही निघेचना. शेवटी प्राणीमित्र संघटनेच्या काही कार्यकर्त्यांना बोलावले पण त्यांचे प्रयत्न हि थकले.

नयनाला मात्र ह्या प्रकाराची भारी गम्मत वाटत होती. काही लोकांनी नयनाचं हसण पाहून तिला बिन हृदयाची, कठोर मनाची, असंवेदनशील, आजची पिढी इत्यादी इत्यादी विशेषणं लावून नावं ठेवली. पण कुणालाच आता काय करावे सुचेना. शेवटी नयनानेच आता अग्निशमन दलाला बोलवा असे सुचवले. त्याप्रमाणे लगेच लाल रंगाची हे एवढी मोठ्ठी गाडी एवधुश्या प्राण्यास वाचवण्यास सरसावली. अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नांच्या नंतर त्यांना यश प्राप्त झाले आणि श्वान राजा आपल्या अनैच्छिक कैदेतून सुटले. सुटल्या क्षणी त्यांनी नयनावर भुंकायला सुरुवात केली. त्यांच्या मालकांनी नयनानेच कुत्रोबांना ड्रेनेज मध्ये ढकलले असा आरोप केला. नयनाला वाईट वाटलं. आरोप केला ह्याचं नाही हो,  तर तो आरोप इतक्या handsome आणि muscular अग्निशमन दलाच्या जवानांसमोर केला म्हणून. पण नयनाने सर्व आरोप धुडकावून लावले.

कॉलनीच्या पुढच्या मिटींगमध्ये ड्रेनेजला कायमस्वरूपी झाकणं लावण्याचा प्रस्ताव पास झाला आणि परत काही कारणांनी अशी कुठली घटना घडू नये म्हणून सोसायटीने कुत्रे पाळण्यावर बंदी घातली. सर्व श्वान प्रेमी रहिवाश्यांनी ह्याला विरोध केला पण तो कमीच पडला. मग काय कुत्रोबा त्यांच्या हायफाय मालकांसोबत कॉलनीसोडून निघून गेले. नयनाला खूप वाईट वाटलं. पण तेव्हा खरं सांगण्या इतकी हिम्मत नव्हती.

आता रोज हॉस्पिटलमध्ये एकाच बेडवर अडकून पडलेल्या नयनाला जाणवलं कि तेव्हा कुत्रोबांना कसं वाटलं असेल. नयनाने आता मात्र तिची चूक कबूल करायचं ठरवलं. तिने एका पत्रात सगळा घटनाक्रम लिहून माफी मागितली. त्या पत्राची एक कॉपी कॉलनीच्या तत्कालीन आणि सध्याच्या अध्यक्षांना पाठवली तर एक कॉपी त्या श्वान राजांच्या मालकांना. कॉलनीत कुत्रे न पाळण्याचा नियम रद्द करण्यात आला आणि नयनाने सुटकेचा नि:श्वास टाकला.

क्रमश:

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s