जूनी पुराणी कथा

रोहिणी अंगणातला पालापाचोळा झाडत होती. सगळी वाळकी पाने, काटक्या आणि सुकलेली फळे एकत्र करून एका बाजूला गोळा करीत होती. इतक्यात वाऱ्याची एक झुळूक आली आणि गोळा केलेली वाळकी पानं विखुरली. रोहिणीला वाऱ्याचा राग आला. थोडं वैतागून तिने परत अंगण झाडायला घेतलं. खराट्याच्या त्या पहिल्याच जोरदार फटाक्याचा मार चुकून त्याच्या पायाला लागला. तो समोर येऊन उभा आहे हे रोहिणीच्या लक्षातच नाही आलं. रोहिणी घाबरून दोन पाउले मागे गेली. त्याच्या पायावर खराट्याच्या काड्यांचे कोरडे ओरखडे उमटले होते. त्याने पायांची थोडी चुळबुळ केली आणि हलकेच विचारले, “अण्णा आहेत का?” रोहिणीने त्याच्याकडे पाहिलं, आणि पाहतच राहिली. जुने पण स्वच्छ धुतलेले कपडे, गळ्याभोवती उपरणं, खांद्यावर शबनम, गव्हाळ रंग, पाणीदार डोळे, काळे कोरडे धुळीने माखलेले केस. रोहिणीच्या लक्षात आलं कि आपण अगदीच टक लावून बघत आहोत. घराकडे बोट करून बागेच्या दिशेने पळून गेली. पळत जाणाऱ्या रोहिणीकडे हसत बघत तो घराच्या दिशेने चालू लागला.

whatsapp-image-2016-12-06-at-6-51-24-pm

रोहिणी धापा टाकत मोगऱ्याच्या वेलाला धरून उभी राहिली. तिला समजलंच नाही काय झालं ते. इतक्यात तिच्या खांद्यावर एक हात पडला. तिने दचकून मागे पाहिलं तर सुषमा वहिनी हातात पुजेची फुलं घेऊन उभी होती. एकीकडे स्त्रोत्र पुटपुटत तिने हातानेच रोहिणीला काय झालं विचारलं. रोहिणी काही नाही अशी मान डोलावून आली त्याच लगबगीने परत अंगणाच्या दिशेने पळाली.

तिने परत सगळं अंगण झाडलं आणि झाडांना पाणी घातलं. आता समोरून घरात जावं कि मागून ह्या विचाराने तिच्या मनात घर केलं. समोरून जावं तर दिवाणखान्यात अण्णांसोबत तो पण असेल आणि मागून गेलं तर माई अजून १० कामं सांगतील. इतक्यात तिला अण्णांनी हाक मारली. तिने साडी नीट केली आणि “आले” अशी आरोळी ठोकत निघाली. नेहमी घराच्या तीन पायऱ्या एका दमात पार करणारी रोहिणी आज एकेक पायरी सावकाश चढून आली आणि दारा बाहेरच थांबली. अण्णा आणि तो समोरासमोर बसले होते. अण्णांनी ओळख करून दिली. “हि आमची रोहिणी आणि रोहिणी हे रामचंद्र. आपली शाळा बघायला आले आहेत. रामचंद्रराव रोहिणी तुम्हाला आमची शाळा दाखवेल आणि गाव पण.” अण्णा रोहिणी शाळा आणि गावाचं कौतुक करत होते. पण रामचंद्रचं लक्ष रोहिणीकडे होतं आणि रोहिणी खाली बघत होती. माईंनी काढलेल्या रांगोळीच्या सुबक रेषा ती अंगठ्याने पुसत होती. रामचंद्रची आपल्यावर असलेली नजर तिच्या लक्षात आली होती. इतक्यात माई दिवाणखान्यात आल्या. त्यांनी अण्णांच्या म्हणण्याला स्पष्ट विरोध केला आणि रोहिणी ऐवजी धाकट्या संजयला रामचंद्र सोबत पाठवलं. रोहिणी गुपचूप आत निघून गेली. तिने संजयने घातलेला पसारा आवरला आणि अंघोळीला गेली. तिने ठेवणीतली त्यातल्या त्यात चांगली साडी नेसली आणि ताठ वेणी बांधून त्यावर मोगऱ्याची एक कळी खोवली.

अण्णांसोबत तासभर मनलावून रियाज केला. अण्णाच दुपारी संजय आणि रामचंद्रसाठी डब्बा घेऊन गेले. तानपुरा आणि रियाजाचे कागद आवरताना रोहिणीला ते उपरणं दिसलं. आता रोहिणीच्या चेहऱ्यावर हलके हसू उमटलं. तिने ते उपरणं घेतलं आणि पळत आपल्या खोलीत गेली. आरशासमोर उभं राहून तिने रामचंद्र सारखं ते उपरणं गळ्याभोवती गुंडाळलं. तिला स्वत:च्या असं करण्यावर आपसूक हसू आलं. मग तिने कपाटावरून अण्णांनी तिला मागच्या दिवाळीला दिलेला शिवणाचा डब्बा काढला. पिवळे, सोनेरी आणि गव्हाळ रंगाचे रेशीम काढले. त्या बारा पदरी रेशमांचे तीन पदरी भाग करून सुईत ओवले. माईंचा रांगोळी काढताना किंवा सुषमा वाहिनीचा गोल पोळ्या लाटताना हात जसा भरभर फिरायचा तसा रोहिणीचा हात त्या उपराण्यावरून फिरू लागला.

whatsapp-image-2016-12-06-at-6-49-17-pm

तिन्ही सांजेची वेळ झाली. आज आकाश पिवळ्या रंगाने भरून गेलं होतं. तो पिवळट सोनेरी प्रकाश वातावरणात भरून राहिला होता. रोहिणी अंगणात तुळशी समोर दिवा लावत होती. अण्णा, रामचंद्र आणि संजय परत आले. रामचंद्र बाहेरूनच निरोप घेऊन निघू लागला पण त्याची एक नजर रोहिणीवर कायम होती. इतक्यात सुषमा वहिनी घराबाहेर आली. तिने रामचंद्रला प्रवासात खाण्यासाठी भूक लाडू दिले आणि त्याचं उपरणं परत केलं. रामचंद्र आभार मानून माघारी फिरला आणि बाकी सगळे घरात वळले. रामचंद्रने गळ्याभोवती गुंडाळण्यासाठी त्याचं उपरणं उघडलं आणि त्यावर भरतकाम केलेली तीन छोटी वाळलेली पाने दिसली. एक हलकं हसू त्याच्या चेहऱ्यावर उमटलं. त्याने मागे वळून पाहिलं तर रात्रीच्या त्या काळोखात तुळशी समोरची पिवळी ज्योत तेवढी तेवत होती. घरात रोहिणी आणि सुषमा वहिनी स्वयंपाकाच्या तयारीला लागल्या आणि बाहेर ती वाळलेली पानं मुठीत बंद करून फाटक उघडून तो निघून गेला.

whatsapp-image-2016-12-06-at-6-48-52-pm

छायाचित्रे: दुर्गेश परमार्थी

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s