नद्यांचा प्रवास

नद्या वाहतात शरीरावरून
पाण्याच्या आणि रक्ताच्या

एका नदीचा उगम होतो डोळ्यांमधुन
डोळ्याखालच्या काळ्या खोबणीतून ती जेव्हा बाहेर पडते
तेव्हा जाळं तयार होत उपनद्यांचं
काही जातात कानाकडे, काही नाकाकडे
काही गालावरच विरुन जातात
तर काही ओठांवर थबकतात
पण काही पार करतात हनुवट्यांचे डोंगर
मानेवरची बारीक लवही थांबवू शकत नाही त्यांना
सरळ खाली कोसळतात
पण तिथे मात्र दोन स्तनांच्या मधेच थबकतात

अजुन दोन नद्या वाहतात स्त्रीच्या योनीतून
एक पाण्याची तर एक रक्ताची
पाण्याची तर रोजच वाहते
रक्ताची येते आणि मग लुप्तही होते
परत  न येण्यासाठी

घामाच्या धारा, पावसाचे थेंब
आणि नळातून येणारं पाणी
शरीरावर ठरण्याआधीच आपण निथळून टाकतो

या नद्यांमुळे शरीर वाहून जात नाही
तरी या नद्यांचा तिटकारा वाटतो
आल्या कधी, गेल्या कधी
या नद्यांचं काही समजतच नाही
या नद्यांमधे बुडण्याचा आनंद
आपण कधी घेतच नाही

शरीरातल्या छिद्रांमधून नद्यांसोबत कधी
मांसल जीव देखील जन्मतात रक्तनदीच्या प्रवाहातून
त्यांनासुद्धा छिद्रं असतात,
त्यांच्यावर सुद्धा चढ-उतार असतात,
नद्या वाहून नेण्यासाठी

नद्यांचा हा प्रवास सुरू राहतो शरीरावरून
एक लुप्त झाली की दूसरी, मग तिसरी…
न मोजता येण्याइतक्या….
आणि अनंत!

cropped-kerala-1.jpg

Advertisements

A WordPress.com Website.

Up ↑

%d bloggers like this: